Thursday, 10 January 2019

कारण मी कवी नाही...

प्रेम केले, पण कधी व्यक्त होता आले नाही..
भावना जरी जपल्या त्या प्रकट मात्र केल्या नाही..
शब्द नसले जोडता आले तरी प्रेम माझे काही उणे नाही..
कारण मी कवी नाही..

माझ्या भावना ही तितक्याच आहेत उत्कट..
जरी त्याला मिळाली नाही शब्दांची चौकट..
पण जपतो मी त्यांना कोणापेक्षा कमी नाही..
जरी मी कवी नाही..

कदाचित असेल मी संसारात गुरफटलेला..
चिंता आणि वेळेच्या बंधनात अडकलेला..
पण त्यासाठी कधी मी सोडला माझा आज नाही..
जरी मी कवी नाही..

निसर्ग असो वा प्रेम किंवा असो नाती वा खेळ..
तितकाच आहे त्यात माझ्या आनंदाचा मेळ..
शब्दात व्यक्त झाला नाही म्हणून तो काही कमी नाही..
कारण मी कवी नाही..

दाद मात्र मी देत असतो. त्या शब्दांना आपलंसं करत असतो.
मला लिहता येत नाही म्हणून त्याला हृदयात जपत असतो.
कधी ते शब्द मला दुसऱ्याचे असे वाटत नाही..
जरी मी कवी नाही..

.... सुमित जेजुरीकर

Sunday, 6 January 2019

मीच मजला सापडलो..

शोधताना मी तुला मी स्वतःला हरवलो..
शब्द सगळे जोडताना अर्थ त्याचा विसरलो..

चालताना माग घेता वाट चुकून मी भटकलो..
रात्र नसताना सुद्धा अंधारात जणू अडकलो..

सागराच्या किनारी पाऊलखुणा म्हणून उमटलो..
लाट येता एक त्याची रेतीसम मी वाहून मिटलो..

गुंतलो धाग्यात इतका की सोडताना गाठ मी तुटलो..
जोडून पाहिले त्यांना जेव्हा नवा मीच मजला सापडलो..

... सुमित जेजुरीकर