Friday, 26 July 2019

प्रेमाच्या गोष्टी..

खूप झाल्या आता प्रेमाच्या गोष्टी..
त्या कविता लिहण तुझ्या साठी..
तुझ्या प्रेमाच्या अन् तुझ्या विरहाच्या..
तुलाच नावं ठेऊन त्यात तुलाच शोधण्याच्या..

कुठे तरी पूर्ण विराम हवा ना त्याच त्याच जुन्या वेदनांना..
त्या टाहो फोडणाऱ्या भावनांना आणि त्या कारुण्याच्या शब्दांना..

अजुन किती जपणार मी तीच जुनी जखम..
जगात कुठेच नसतं अश्या जखमेच मलम..
आता नाही सलणार ती कारण कुठे तरी ह्याचा अंत हवा..
जुन्या आठवणीचा पाश तोडून नवा एक सूर्य उगवावा..

पुरे झालं आता तुझ्या आठवणी मध्ये हरवण..
शब्दांचे पुल बांधून पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी जाणं..
आज सगळे बांध तोडून मी झुगारून देतो ते बंध..
समजूत घालून स्वतःची सुटका करून घेतो सबंध..

आता घेतला मोकळा श्वास आणि नव्या जगण्याची सुरुवात..
वाट पाहत आहे माझी, रात्र संपून होणारी नवी पहाट..
मागे पडलं हे घडलेलं, विसरून गेलो त्या गाठीभेटी..
समुद्राची लाट जशी वाहत नेते पाऊलखुणांच्या रेती..

आता सगळे विचार नवे आणि नवी वळणे..
मार्ग सोपा नाही तरी थांबणार नाही पावले..
आता नको प्रेम बिम म्हणून मी जेव्हा कुठे सावरलो..
नव्या वाटेवर एका वळणावर मी पुन्हा प्रेमात पडलो..

....सुमित जेजुरीकर

पाऊस

हा पाऊस माझ्या आठवणीतला पाऊस अन् अगदी तुमच्या सगळ्यांच्या आठवणीतला पाऊस..

कुठे तरी जाताना मध्येच थांबवणारा पाऊस..
कुणाची तरी आठवण घेऊन हळूच भिजवणारा पाऊस..
चाललेल्या वाटेवरून परत मागे फिरविणारा पाऊस..

कधी हलक्या हलक्या सरींनी तो मातीला गंध देणारा पाऊस..
कधी वादळा संगे स्वार होऊन सगळं ध्वस्त करणारा पाऊस..
तो सुकलेल्या ओसाड वाळवंटाला हिरवा स्वर्ग करणारा पाऊस..

तो त्या पानांवरच्या दवाला जन्म देणारा पाऊस..
कधी झरा बनून दरीखोर्यातून ओसंडून वाहणारा पाऊस..
ते सौंदर्य पाहून अंगावर शहारे आणणारा पाऊस..

कधी फक्त दुरूनच छान दिसणारा पाऊस..
कधी त्याच्याकडे बघत चहा पीत मस्त   वाटणारा पाऊस..
कधी धुक्याला ओंजळीत घेत हरखून टाकणारा पाऊस..

कधी प्रेमाची नवी पालवी फुलवणारा पाऊस..
कधी विरहाची आठवण करून देणारा पाऊस..
तर कधी तुमच्या आमच्या नात्यातला मायेच्या ओलाव्याचा पाऊस..

कधी नवी आशा जागवणारा तर कधी नैराश्याचा पाऊस..
कधी ग्लासामध्ये बर्फासोबत पडणारा रंगीत पाऊस..
तीच नशा बनून हळू हळू डोक्यात चढणारा पाऊस..

कधी तहाननेल्या जीवाला दिलासा देणारा पाऊस..
कधी त्यातच बुडवून जलसमाधी देणारा पाऊस..
सुजाण कधी अन् कधी उधानलेला पाऊस..

त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा हासू असलेला पाऊस..
ना दिसला तर त्याच्या डोळ्यात दाटून येणारा पाऊस..
कधी त्याच्या हृदयातला पाऊस कधी माझ्या हृदयातला पाऊस..

हा सगळीकडे वेगळा वेगळा असणारा..
कुणाला आनंद तर कुणाला दुःख देणारा..
पण तरीही हवाहवासा वाटणारा..
तुमच्या आठवणीतला पाऊस अन् माझ्या आठवणीतला पाऊस..

....सुमित जेजुरीकर